Tuesday, January 27, 2009


मेघपडद्याच्या महाली
धुंद ओल्या मैफिली
वाट पाहे आस वेडी
रापल्या मातीतली


सोसलेल्या जाणिवा
तृष्णा अशी सोकावली
थेम्बही उमले शहारा
वेधतान्ना चाहुली

कुंद व्याकुळ पवन कंठी
यातना आर्द्रावली
अंकुराला जाग आली
पालवी नादावली

चांदणे शिंपीत सजली
कोर चंद्राची भली
गुंतली वृक्षात वेली
वृक्ष झाला सावली


..............अज्ञात२३/०१/२००९

मनाच्या कपारी



मनाच्या कपारी अगणित पैलू
कळे ना काय ते हवे नेमके
पंखात वारा दिशाहीन फेरा
कुणी ही न पैजा जिंकू शके


रुपे आणि सोने असे ना
सुखाची कळा वेगळेच बेचके
जिथे ज्यास ज्याची पटे खूणगाठ
तिथेही भ्रमाची पाल चुकचुके

समाधान कैचे; क्षणाची उसंत
फुले जो वसंत तेच शेलके
नदीच्या प्रवाहापरी चालवावे
अखेरीस भेटेल जे नेटके


...............अज्ञात२४/०१/२००९

किंचित


स्पंदने;.....

शरिर-मनापलिकडली,......

घेउन येतो वारा,.....

झुलतो श्वास पिसारा,...

उघडून ऋणांची पाने; उलगडतो शब्दपसारा


स्फुरतात प्रेरणा; खोल नभातिल तारा

आसमंत ढवळतो एक एक पळ; स्मरणचरण येणारा

क्षितिजास कळे ना हा स्वप्नांचा डेरा

चालतो कसा अन कुठे शोधतो थारा

कल्पनेस अगणित दारे

पिंजून काढतो जुना नवा गाभारा,......

रचनांच्या किंचित धारा;॥

येती माहेरा........


...................अज्ञात

Sunday, January 11, 2009

Saturday, January 10, 2009

आडाखे

मनाचे आडाखे अडे ना कुठे
दिशा; वाट अवघी दिसे मोकळी
दुरावा कितीही असो संगतीचा
मुक्या जाणिवा रंगती मृगजली

जळाच्या पखाली , रित्या ओन्जळी
स्वप्न फोफावते उमलते कळी कळी
असे ना खरे इथे रिकामीच झोळी
उराशी जळे वेदना ही अवेळी

...........................अद्न्यात

सोन्गट्या

जे सरले ते तिथेच असु दे
वळू नको तू मागे
भले बुरे भूतास राहु दे
नको करू ते जागे

द्यूत पटातिल आम्ही सोन्गट्या
ठेच कधी ना लागे
खेळगड्याची हार-जीत
तो जीत सदाही मागे

सोंग जमे ना भातुकलीचे
मीच मनाला सांगे
भाळु नको अस्तित्वच खोटे
सत्य असे हे नंगे

.................अद्न्यात

जत्रा

कितीक आले गेले तरीही
सुरूच आहे जत्रा
कशास वेडया कावा करिसी
खुळ्यागतासम मित्रा

हृदयाचे कोंदण हळवे
ओन्जळ भरून दे पात्रा
गात्रांस देइ दे भूलकोवळी
चैतन्याची मात्रा

नैमित्तिक येणे जाणे भेटणे
कोणही चिरंजीव नाही,....
ह्या जगतात

मानवापरी तू द्यावे एक प्रमाण,...
इथे,....
जड़ प्राणीही जगतात

..................अद्न्यात